मुल तालुक्यातील बेंबाळ क्षेत्रातील २४ ग्रीड पाणीपुरवठा योजने अंतगर्त येणाऱ्या २४ गावे व परिसरातील इतर गावांचा गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी ग्रामपंचायत बेंबाळ येथे भेट दिली असता, पाणीपुरवठा विभागाचे १२ लाख रुपयांचे विज बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा सयंत्राची वीज कापली असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे बेंबाळ आणि लगतच्या सहा गावांतील पाणीपुरवठा बंद झाला होता. पाणीपुरवठा पूर्वरत सुरु न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिला होता.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या कि पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार आहे आणि वीज बिल भरले नाही म्हणून प्रशासन नागरिकांना मुलभूत अधिकारापासून वंचित ठेऊ शकत नाही. पाणी हि जीवनावश्यक गरज आहे त्यासाठी भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखायला पाहिजेत.