पोंभुर्णा – आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन तालुकाध्यक्ष श्रीकांत शेंडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन भूमिपुत्र ब्रिगेडने अभिष्टचिंतन सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले.
यावेळी संपूर्ण पोंभुर्ण तालुक्यातील तसेच शहरातील भूमिपुत्र ब्रिगेडचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात संघटन बांधणी, निवडणूक रणनीती इत्यादी बाबींचा कार्यकर्त्यांचा गावनिहाय आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. समीर कदम यांनी आगामी होणारी निवडणूक भूमिपुत्रांसाठी लढाई प्रमाणे असून प्रत्येक भूमिपूत्राने कंबरकसून कामाला लागावे असा प्रखर संदेश दिला.
शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार तसेच आदिवासी मागासवर्गीय ओबीसी समाज व गोरगरीब सामान्य जनतेचे सक्षम नेतृत्व जो करेल त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निश्चय यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला.
“गरीब कुटुंबातून येऊन समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण करणारे श्रीकांत शेंडे यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्यासारखेच सामान्य कुटुंबातून येऊन समाज उन्मुख कार्य करणारे युवक समाजास पाहिजे” असे प्रतिपादन याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. राकेश गावतुरे यांनी केले.