जिल्हा प्रतिनिधी प्रा. राणी कुमरे
गडचिरोली, १० जुलै २०२४
एका बाजूला बस स्थानके बांधण्यात आणि त्यांची देखभाल करण्यात कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना, दुसरीकडे बसच्या देखभालीकडे, कर्मचाऱ्यांच्या सुविधांकडे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवासाचे एकमेव साधन असलेल्या बस सेवेची दयनीय अवस्था उघड झाली आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि सुविधायुक्त प्रवास मिळावा, या मूलभूत गरजेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नुकताच, घोट ते गडचिरोली या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये पावसाचे पाणी गळत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवाशांना बसमध्येच छत्र्या उघडून बसावे लागत असल्याचे दिसत आहे. सर्व सीटवर पाणी गळत असल्याने अनेक प्रवासी – ज्यामध्ये पुरुष, महिला आणि शाळकरी मुलांचाही समावेश आहे, यांना उभे राहून प्रवास करावा लागला. ही विदारक दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वीही राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बसचा पत्रा उडाल्याची घटना घडली होती. आता पावसाळ्यात गळणाऱ्या बसमधून प्रवास करण्याची वेळ आल्याने नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
शहरी भागात वातानुकूलित बसमधून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध असताना, दुर्गम भागातील नागरिकांना मात्र जीव मुठीत धरून अशा धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.