लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कार्यकर्त्यांना नवा जोश देण्याचा प्रयत्न
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्यांना नवा जोश देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला आहे. वरोरा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरची मरगळ झटकून टाकण्याचे आवाहन केले.
हंसराज अहीर म्हणाले, “कार्यकर्ता ही भाजपची खरी ताकद आहे. आपण केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख धोरणांचा व कार्यक्रमांचा संदेश मतदारांपर्यंत आत्मविश्वासाने पोहोचवला पाहिजे.” त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचे आवाहनही केले.
कार्यक्रमात बोलताना अतुल देशकर यांनी कार्यकर्त्यांच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “मंत्री, खासदार, आमदार ही पदे अस्थायी असतात, पण कार्यकर्ता हा कधीच ‘माजी’ होत नाही. तो पक्षाचा आत्मा आहे.” संजय गजपुरे यांनी विरोधकांच्या जातीय राजकारणावर टीका केली आणि कार्यकर्त्यांना त्याला प्रतिकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. अधिवेशनात तालुक्यातील दिवंगत झालेल्या 42 पक्ष कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रमेश राजूरकर यांनी लोकसभा निवडणुकीतील कमतरतांचे विश्लेषण करत भविष्यातील निवडणुकांसाठी एकजुटीने तयारी करण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अतुल देशकर, जिल्हा संघटक महामंत्री संजय गजपुरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय राऊत, प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष अहेतेशाम अली, प्रदेश भाजयुमो सचिव करण देवतळे, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख रमेश राजूरकर, डॉ. भगवान गायकवाड, ज्येष्ठ नेते बाबा भागडे, वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष डॉ सागर वझे, नरेंद्र जीवतोडे, किशोर टोंगे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शुभांगी निंबाळकर, सुनीता काकडे, ज्योती वाकडे, संजय राम, युवती आघाडी प्रमुख मोनिका टिपले उपस्थित होते.