चंद्रपूर वन विकास महामंडळाने (FDCM) एका धक्कादायक निर्णयात सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, ज्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. कर्तव्यात कसूर ठेवल्याचा गंभीर आरोप ठेवत ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि वन मजूर यांचा समावेश आहे.
निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे सुनील पांडुरंग आत्राम (वनपरिक्षेत्र अधिकारी), विपुल संभाजी आत्राम (वनपाल), उमेश प्रल्हाद डाखोरे (वनपाल), नेताजी मोहन बोराडे (वनपाल), प्राची देवकुमार चुनारकर (वनरक्षक), किशोर हिरामण गेडाम (वनमजूर) याप्रमाणे आहे.
या कारवाईमागील कारणांचा शोध घेताना असे समजते की, चंद्रपूर वन विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या मामला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४१२ मध्ये अवैध वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात वृक्षतोड केलेला माल आरोपींकडून जप्त करण्यात आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निष्कासन कामाव्यतिरिक्त दुसऱ्या क्षेत्रात विनापरवानगीने झाडांची तोड करून विक्री आगारात साठवण केल्याचे प्रकरण असल्याची दबक्या आवाजात वनविकास महामंडळा मध्ये चर्चा आहे. जप्त केलेल्या मालाचा लिलाव करण्याची चर्चा सुरू होती.
मात्र, वन विकास महामंडळाने या निलंबनामागील निश्चित कारण अद्याप जाहीर केलेले नाही. ही बाब लक्षात घेता, या कारवाईमागे अधिक गंभीर कारणे असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वन विकास महामंडळाने केलेली ही कारवाई जिल्ह्यातील एक मोठी कारवाई म्हणून पाहिली जात आहे. या निर्णयामुळे वन विकास महामंडळ आणि वन विभागातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना आपल्या नोकरीची चिंता सतावत असल्याचे दिसून येत आहे.
वन संरक्षण आणि व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपशील उघड होण्याची प्रतीक्षा वन विभागातील कर्मचारी, पर्यावरणप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
वन विकास महामंडळाच्या या निर्णयामुळे वन संरक्षणाच्या कार्यपद्धतीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.