“आमच्या शाळेला शिक्षक द्या” या घोषणेसह शेकडो विद्यार्थी, त्यांचे पालक आणि गावकरी यांनी दिनांक ५ जुलै २०२४ रोजी शिक्षण बचाव समितीच्या सदस्य आणि भूमिपुत्र ब्रिगेडच्या संयोजिका डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालयात आंदोलन केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना दाखल घ्यावी लागली. त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नवेगाव मोरे तालुका पोम्भूर्णासाठी तीन शिक्षकांच्या नियुक्तीचा आदेश काढला.
गेल्या काही दिवसांपासून नवेगाव मोरे जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये सहा वर्ग आणि १८७ विद्यार्थी असूनही केवळ दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक यांच्यावर शाळा सुरू होती. विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गासाठी शिक्षकांची मागणी केली होती.
विद्यार्थी, पालक आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना प्रश्न विचारले की दोन शिक्षकांवर एवढी मोठी शाळा आणि पाचवी ते दहावीचे वर्ग कसे चालू शकतात आणि या सात वर्गांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होऊ शकतो.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी राज्य सरकारच्या शिक्षणविषयक अनास्थेमुळे फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षणाची अशी अधोगती झाल्याचा आरोप केला.
११ जुलै २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन शिक्षकांची नियुक्ती केल्याबद्दल आणि एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द केल्याबद्दल डॉ. गावतुरे यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये वर्ग आणि विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षक नसल्याचे सांगून, सर्व शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नियुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या आंदोलनामध्ये सरपंच जगदिश सेमले, उपसरंपच रेखाताई मोरे, सदस्य हर्षानंद दुर्गे, अमोल लोहे, देवेंद्र कष्टी, रुपाली मोरे, माजी सरपंच सौ प्रतिमा पौरकार, शाळा समिती अध्यक्ष कुसमाग्रज येलमुले, बंडु अर्जुनकार, राजु अलगमकार, संजय झगडकार, भारत मोरे, धर्मेंद्र मेश्राम, श्री विश्वास, संजय कुंभरे, मेघराज भडके, सदिप गुडपले, कमलाकर झाडे, भिमराव मरस्कोले, संजय भडके, विनोद मोरे, प्राविण झाडे, कुशाल झाडे, बापुजी गौरकार, किशोर पावडे, अंशुल मोरे, मशाखेत्री, पालक वर्ग यांनी अमूल्य योगदान दिले.