विधिमंडळ अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळांवरील नियुक्त्यांची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांकडून वरिष्ठ नेतृत्वावर दबाव वाढत असला तरी, या निर्णयामुळे होणाऱ्या संभाव्य नाराजीचा विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची भीती सत्ताधारी पक्षांना आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांसाठी विस्तार करावा की नाही, याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये विचारविनिमय सुरू आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. महायुती सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली असून, आता मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ नियुक्त्यांद्वारे पक्षातील नेत्यांना संधी द्यावी, अशी मागणी तिन्ही घटक पक्षांमधून होत आहे. मात्र, मर्यादित जागा आणि त्यांच्या वाटपावरून असलेल्या वादामुळे आतापर्यंत हा निर्णय टाळला गेला आहे.
विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त बारा सदस्यांच्या नियुक्त्यांबाबत मात्र लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या दिल्ली भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत या मुद्द्यावरही विचारविनिमय झाल्याचे समजते.