अशुद्ध पाणी आणि मूलभूत आरोग्य सुविधांअभावी ग्रामस्थांचे हाल

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील शेवटचे गाव गंगापूर टोक येथे अतिसार रोगाने थैमान घातल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या परिस्थितीची दखल घेत डॉ. अभिलाषा गावतुरे या त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत गावामध्ये जावून पाहणी केली.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, नवेगाव मोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा भोयर, आशाताई आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी गंगापूर टोक आणि आसपासच्या गावांतील आरोग्य परिस्थितीची माहिती घेतली.

डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सांगितले कि, “एकीकडे आपण स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत आणि देशात सरकारने अमृत महोत्सव साजरा केला पण असे कितीतरी गावे आहेत जिथे मुलभूत गरजा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तापाच्या साथीची लागण होत असल्याचे लक्षात येताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कमालीची दक्षता दाखल्याने ते नक्कीच कौतुकीस पात्र आहेत पण अपुऱ्या पायाभूत सोई-सुविधा अभावी त्यांना सुद्धा लोकांना आरोग्य सेवा देणे कठीण जात आहे. अशुद्ध पिण्याचे पाणी हे अतिसार रोगाचे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे.”

चिंतेची बाब म्हणजे मुल आणि पोंभुर्णा तालुक्यात पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न दीर्घकाळापासून भेडसावत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलजीवन मिशन व प्राधिकरणाद्वारे राबवल्या जाणाऱ्या बहुतांश योजना निकामी झाल्या आहेत. गावकऱ्यांनी या समस्येकडे वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधले असतानाही, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की यापुढे तरी प्रशासन पिण्याच्या पाण्याच्या व इतर साथीच्या रोगांबाबत गांभीर्याने विचार करेल.

गावकऱ्यांनी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसे डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णवाहिका नसल्याची खंत व्यक्त केली. साथीचे आजार आणि सर्पदंशाचे प्रमाण जास्त असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून, प्रशासन आणि आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी डॉ. अभिलाषा गावतुरे आणि गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *