चंद्रपूर, ३१ ऑगस्ट (प्रतिनिधी)
महिलांवरील वाढत्या हिंसाचाराविरूद्ध आवाज उठवत, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, विधान परिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले, डॉ. अभिलाषा गावतुरे, रामू तिवारी, प्रशांत भारती, चंदाताई वैरागडे, मंगेश गुलवाडे, दिलीप चौधरी, एड. फराद बेग यांच्यासह शेकडो महिला आणि पुरुषांनी शनिवारी रात्री शहराच्या रस्त्यांवर मशाली पेटवल्या. ‘चंद्रपूर जागृती मशाल मंच’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘डॉटर्स ऑफ चंद्रपूर – रीक्लेम द नाईट’ या अभिनव उपक्रमा अंतर्गत हा मार्च काढण्यात आला.
देशात आणि महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाता महिला डॉक्टर असो वा महाराष्ट्रातील बदलापूर येथील चिमुकली, महिलांवरील अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना या सारख्याचं. या पार्श्वभूमीवर, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी आवाज उठवण्याचा निर्धार ‘चंद्रपूर जागृती मशाल मंच’ने केला. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ९.३० वाजता शहरातील गांधी चौक येथून सुरू झालेला हा शांतीमय मोर्चा प्रियदर्शनी चौकापर्यंत पोहोचला. मार्चमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात मशाली घेऊन “महिला सुरक्षा, आमचा हक्क”, “न्याय हवा, अत्याचार नको” आणि “मानवता कि यही पुकार, बंद करो अत्याचार” अशा घोषणा दिल्या.
यावेळी प्रतिक्रिया देतांना चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार सुधाकर अडबाले यांनी देशात, राज्यात आणि विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिलांवर अत्याचाराच्या घडणाऱ्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करीत निषेध केला. खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या कि, पश्चिम बंगालमधील कोलकातील महिला डॉक्टर, महाराष्ट्रातील बदलापूर येथील चिमुकली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरातील रेल्वे कर्मचाऱ्याने आणि वरोरातील शिक्षकाने केलेल्या अत्याचाराच्या घटना फार दुर्दैवी आहे. आमदार सुधाकर अडबाले पुढे म्हणाले कि, या शांतीमय मोर्चात चंद्रपुरकर, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. महिलांवरचे व मुलींवरचे अत्याचार थांबले पाहिजेत. बदलापूर येथे घडलेली घटना हि फार दुर्दैवी आहे आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्या तरीही प्रशासन मात्र कुठेही योग्य ती कारवाही करतांना दिसत नाही, त्याचा निषेध म्हणून चंद्रपूरकरांनी या मार्च चे आयोजन केले आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्रात दररोज सरासरी १०९ महिला विविध गुन्ह्यांच्या बळी ठरत होत्या. २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत ही संख्या वाढून १२६ पर्यंत पोहोचली.
देशपातळीवर २०२२ मध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची ४,२८,२७८ प्रकरणे नोंदवली गेली, जी मागील वर्षांच्या तुलनेत २६.३५% अधिक आहेत. बलात्कार, लैंगिक छळ, घरगुती हिंसाचार, हुंडाबळी आणि ऑनलाइन छळ या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे.
मोर्चाच्या आयोजन समितीमध्ये एड. पारोमिता गोस्वामी, अश्विनी खोब्रागडे, डॉ. जयश्री कापसे, डॉ. ज्योती राखुंडे, डॉ. नसरीन मवानी, एड. वर्षा जामदार, प्रीतिवा साहा, एड. इतिका साहा, संजीवनी कुबेर, एड. तब्बसुम शेख, नेहा शंकर, शरयू कुबेर, सुरेखा चिडे, मुन्नी शेख यांचे अमुल्य योगदान आहे. आयोजक समितीच्या प्रवक्ताने बोलताना सांगितले कि, “महिलांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे यायला हवे. आमच्या या उपक्रमातून आम्ही महिलांना रात्रीच्या वेळी सुरक्षित वाटावे, या हक्कासाठी आवाज उठवत आहोत.”
मार्चमध्ये सहभागी चंद्रपूरकरांनी शपथ घेतली कि, देशातील प्रत्येक स्त्री-पुरुष समान आहेत. देशात स्त्रियांसाठी मोकळे व निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे आणि या देशाचा नागरिक म्हणून स्त्रियांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी जागृत राहून भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांचे रक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडेल. राष्ट्रगीतने शांतीमय मोर्चाची सांगता झाली.
‘डॉटर्स ऑफ चंद्रपूर’ या उपक्रमाने शहरवासीयांमध्ये महिला सुरक्षेबाबत जागृती निर्माण केली आहे. आयोजकांनी भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करून समाजात जनजागृतीची मशाल सतत पेटत राहील असे आश्वासन दिले आहे. चंद्रपूरच्या रस्त्यांवर पेटलेल्या मशालींनी महिलांच्या सुरक्षेसाठी एक नवा प्रकाश दाखवला आहे, जो समाजातील अंधाराला दूर करण्यासाठी मदत करेल.