जिल्हा प्रतिनिधी प्रा. राणी कुमरे
गडचिरोली, ९ जुलै २०२४
अहेरी आणि आलापल्ली येथील शासकीय कंत्राटदार संघटनेने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे. या पत्रात संघटनेने निविदा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या निविदा ऑफलाइन पद्धतीने काढण्यात आल्या. मात्र या निविदांची माहिती केवळ मोजक्याच कंत्राटदारांपर्यंत पोहोचली, ज्यामुळे अनेक पात्र कंत्राटदारांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली नाही.
संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत:
१. सर्व निविदांची माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करावी.
२. सर्व ऑफलाइन निविदांची एक प्रत शासकीय कंत्राटदार संघटना अहेरी आणि आलापल्ली यांना द्यावी.
३. १.५० कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या कामांसाठी शासन निर्णयानुसार विशेष अटी व शर्ती न ठेवता सर्व कंत्राटदारांना सहभागी होण्याची संधी द्यावी.
संघटनेने इशारा दिला आहे की जर या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर ते कार्यालयासमोर उपोषण करतील आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार नोंदवतील.
सदर निवेदन देणाऱ्या शिष्ठमंडळात शासकीय कंत्राटदार संघटना अहेरी व आलापल्ली चे पदाधिकारी आणि सदस्य श्री. लक्ष्मण गद्देवार, श्री. सत्यनारायण म. गद्देवार, श्री. प्रशांत एस.पत्तीवार, श्री कैसर खान, श्री रामेश्वर कडूजी, श्री.सतीश मुक्कावार, श्री सुमित मुक्कावर, श्री अक्षय चल्लावार, श्री हरीश सिडाम, श्री दानिश शेख, श्री. भूषण शेकुर्तीवार, श्री. एस. एस. रायपुरे, श्री. विनायक एम. सोनुले, श्री. निखील संगीडवार, श्री. तिरुपती पत्तीवार, शालिनी निब्रड (पोहणेकर) हे होते. या पत्राची प्रत अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोली आणि जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनाही पाठवण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी विभाग कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवेदना मुळे सर्व सामान्य कंत्राटदार यांना काम मिळेल हा आशावाद संघटनेच्या पदाधीकारी यांनी व्यक्त केला आहे.