सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची असल्याचा अभिमान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

वन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते मा. पंतप्रधान कार्यालयाकरिता बल्लारपूर येथून दिल्लीला काष्ट रवाना. बल्लारपूरातील एफ.डी.सी.एम. च्या काष्ट आगारातून मा. सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून केली दिल्लीला रवानगी. याआधीही राम मंदिर, नवे संसद भवन आणि भारत मंडपम या वास्तुंसाठी सागवान पाठवण्यात आले होते. मा. पंतप्रधानांचे संपूर्ण कार्यालय येथील सागवान लाकडाने सजणार आहे.

यावेळी मा. मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य गीतातील ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ आठवण करत आजच्या क्षणाचे महत्व सांगितले. भारतातील सर्व नागरिकांना न्याय देणारी सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची राहणार आहे, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे, अशा भावना राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कि, बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणा-या खुर्चीवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा गौरव, विकास आणि प्रगतीचे उच्चांक गाठणार आहे, यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. मा. पंतप्रधान कार्यालयासाठी 3018 घन फूट लाकूड दिल्लीला जात आहे.

पालकमंत्री मा. मुनगंटीवार यांनी १९४२ च्या ‘चाले जाव’ चळवळीची आठवण करत जिल्ह्यातील ‘चिमूर क्रांती’ तून देश्याच्या स्वतंत्र लढ्यातील योगदान अधोरेखित केले. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तयार करण्यात आलेला 7 फुटांचा तिरंगा ध्वज आजही पंतप्रधान कार्यालयात डौलाने उभा आहे, असेही वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी वनविभागात आणि एफडीसीएममध्ये काम करणाऱ्या प्रत्येक वनरक्षक, वनमजूर, एफडीसीएमचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *