“४०० पार विजयाच्या आत्मविश्वासाने मतदार सुट्टीवर”, शिंदेंचा धक्कादायक दावा मुख्यमंत्री शिंदेंनी पराभवाचं खापर फोडलं मतदारांवर

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेल्या धक्क्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका धक्कादायक विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. शनिवारी मुंबईत झालेल्या महायुतीच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलताना, शिंदे यांनी पराभवाचे कारण मतदारांवर ढकलले.
“आपण ४०० हून अधिक जागा जिंकणार असल्यामुळे आपले हक्काचे मतदार मतदानाच्या दिवशी सुट्टीवर गेले,” असे विधान करत शिंदेंनी सर्वांना चकित केले. त्यांच्या मते, पंतप्रधान मोदींच्या ४०० पार जागा जिंकण्याच्या आश्वासनामुळे मतदार आत्मविश्वासी झाले आणि मतदानाऐवजी सुट्टीचा आनंद लुटण्यास प्राधान्य दिले.
शिंदे पुढे म्हणाले, “आपण गाफील राहिलो आणि विरोधकांचे ८० टक्के मतदार ठपाठप मतदान करून गेले. आपल्या ६० टक्के मतदारांनीही जर मतदान केले असते तर आपल्या ४० जागा निवडून आल्या असत्या.” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मताला दुजोरा दिला. त्यांनी विरोधकांच्या “खोट्या प्रचारा”वर टीका केली आणि म्हटले की महायुतीचे नेते या अपप्रचाराला प्रभावीपणे उत्तर देऊ शकले नाहीत.
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांपैकी महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या. या निकालानंतर, महायुती आता विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने रणनीती आखत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *