नांदेड जिल्ह्यासह परिसरातील अनेक भागांमध्ये आज सकाळी ७:१४ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची सकाळ अचानक गडबडीची झाली. धक्का बसल्यानंतर अनेक नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडणे पसंत केले. भूकंपाचा धक्का अतितीव्र नसला तरी साधारणतः दोन ते तीन सेकंदांपर्यंत खिडक्यांच्या काचा कंपन पावत असल्याचे अनेकांनी अनुभवले.
नांदेडसोबतच हिंगोली आणि परभणी या शेजारील जिल्ह्यांमध्येही हा ४.५ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. कळमनुरीच्या परिघात येणाऱ्या बहुतांश भागांमध्ये भूकंपाचे धक्के स्पष्टपणे अनुभवले गेल्याची माहिती समोर आली आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे आतापर्यंत समोर आलेले नाही. तरीही त्यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे, ज्या नागरिकांच्या घरांचे छत पत्र्याचे आहे आणि त्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, त्यांनी ते दगड त्वरित काढून घ्यावेत, असे महत्त्वाचे सूचन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ही सूचना भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
भूकंपाच्या या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कता वाढली असून, प्रशासनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.