गडचिरोलीच्या दुर्गम भागात असामन्य सेवा देणाऱ्या डॉक्टर यांचा विडीओ सोसीयल मिडिया वर वायरल होत आहे. डॉ. संभाजी देवराव भोकरे यांच्या निःस्वार्थ सेवेची ही गोष्ट आपल्याला मानवतेच्या उंच शिखरावर नेऊन ठेवते. १५ जुलैला भामरागड तालुक्यातील लाहेरी गावात एक अविस्मरणीय दृश्य पाहायला मिळाले. डॉ. भोकरे स्वतः मलेरियाच्या विळख्यात असताना, एका हाताला सलाईन लावून दुसऱ्या हाताने रुग्णांसाठी औषधे लिहित होते. त्यांच्या या अतुलनीय समर्पणाचे छायाचित्र आता सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरत आहे.
हिंगोलीच्या या सुपुत्राने भामरागडसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. गडचिरोली – महाराष्ट्रातील मलेरियाचे ‘हॉटस्पॉट’ – इथे डॉ. भोकरे यांनी आपले कर्तव्य कधीही बाजूला ठेवले नाही. त्या दिवशी, स्वतःच्या आजारपणात देखील, त्यांनी आदिवासी रुग्णांना परत पाठवले नाही. बाह्यरुग्ण विभागात खुर्चीवर बसून, डाव्या हाताला सलाईन लटकत असताना, त्यांनी उजव्या हाताने रुग्णांची तपासणी केली आणि औषधे लिहिली.
डॉ. भोकरे यांच्या या असामान्य कर्तव्यनिष्ठेने सर्वांना भारावून टाकले आहे. त्यांच्या या कृतीतून एक प्रश्न उभा राहतो – आपल्या आरोग्य व्यवस्थेत अशा समर्पित वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य ते स्थान आणि सुविधा मिळत आहेत का?
गडचिरोलीच्या दुर्गम भागात डॉ. भोकरे यांच्यासारखे अनेक ‘देवदूत’ आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. त्यांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेण्याची आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची गरज आहे. कारण अशा व्यक्तींमुळेच खऱ्या अर्थाने ‘सेवा’ या शब्दाला अर्थ प्राप्त होतो.