बाईचे बाई पण
बाई सोनेरी पहाट
सडा रांगोळीचा थाट
बाई पदर सांभाळी
करी संसाराचा घाट…
बाई दिव्यातील वात
बाई प्रेमळ ती साथ
बाई नसता घरात
विचारत सरे रात….
बाई स्वर्गाचे ते दार
बाई जीवनाचे सार
फांद्या वाकल्या झूकल्या
तरी कष्ट ते अपार…
बाई हिरवाई गोंदण
बाई परक्याच आंदन
बाई तुझ्या कर्तुत्वाला
माझे त्रिवार वंदन…
बाई ममतेचे रुप
बाई जगदंबा स्वरूप
पै पाहुणा आल्यास
असे आनंद हुरूप…
बाई असता घरात
तुळस अंगण हसे
जन्म देण्या नवजीवा
कळ अपार ती सोसे…
बाई ढेकळात दिसे
बाई अन्नपूर्णेत वसे
किती झिजली बिझली
खरे सौंदर्य तिचे दिसे…
बाई आधाराचे झाड
असे मजबूत खोड
ऊन वारा वादळाला
तिच्या नसे काही तोड…
Àqसीमाराणी बागुल नाशिक ✍️