शुभम कावळे, चंद्रपूर
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज जोरदार टोलेबाजी केली. ब्रह्मपुरी शहरात कुणबी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबतच भाजप आमदार परीणय फुके यांची देखील मंचावर उपस्थिती होती. राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार याच ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. गेली काही वर्षे ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीत आपल्यावर अल्पसंख्य समाजाचे लोक प्रतिनिधित्व करत आहेत. ही परंपरा बदलली पाहिजे असे मत खा. धानोरकर यांनी भाषणातून व्यक्त केले. कुणबी समाज काही राजकारणी लोकांच्या भूलथापांना बळी पडून मॅनेज होतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हे बदला असे आवाहन त्यांनी वडेट्टीवार यांचे नाव न घेता केले. भाजप आमदार परिणय फुके यांनी देखील आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या मतदारसंघातून कुणबी चेह-याला तिकीट द्यावे यासाठी गळ घालणार असल्याचे म्हटले.