चंद्रपूर मधील नगीना बाग प्रभागातील दीर्घकालीन पाणी समस्येवर उपाययोजना करण्यासाठी भूमिपुत्र ब्रिगेड महिला विंगने पुढाकार घेतला आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून या भागातील रहिवासी पावसाळ्यात जमा होणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे त्रस्त आहेत.
मिशन कंपाऊंडच्या आतील जागा आणि सेंट मायकल शाळेच्या वरील भागातून वाहणारे पावसाचे पाणी महाडोळे लेआउटमधील खोलगट भागात आणि जवळपास 10 ते 15 घरांमध्ये शिरते. या समस्येवर तातडीने उपाय करण्याची मागणी करण्यासाठी भूमिपुत्र ब्रिगेड महिला विंगने महानगरपालिका आयुक्त, चंद्रपूर यांना निवेदन दिले.
निवेदन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भूमिपुत्र ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबत पाणीग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी पाइपलाइन टाकून पाण्याचा मार्ग बदलवून ही समस्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले.
या मोहिमेत भूमिपुत्र ब्रिगेड महिला अध्यक्षा छायाताई सोनुले यांच्यासह वनिता गुरनूले, पुष्पा मोहूर्ले, पुनम मोहूर्ले, शारदा गुरनूले, विजया गुरनूले, रेश्मा मून, मायाताई गुरनूले, भारती गुरणुले आणि नंदा गवळी यांची उपस्थिती होती.